सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची पाण्यासाठी धावपळ; पंप नादुरुस्त

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाण्याच्या पंपाने अचानक साथ सोडल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. पाणीपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. अखेर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी सायंकाळी अचानक पाण्याचा पंप नादुरुस्त झाला. त्यामुळे रुग्णालयातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि रुग्णांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.

या प्रकाराची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना मिळताच त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे तात्पुरता पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी राजू मसुरकर यांनी रुग्णालयाचे अधिकारी आनंदराव गायकवाड आणि मुख्य सिस्टर गौरी गोसावी यांच्याशी संपर्क साधत नादुरुस्त पंप तसेच इलेक्ट्रिक पॅनेलच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही केली. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने इलेक्ट्रिक पॅनेलची दुरुस्ती करण्यात आली.

विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी राजू मसुरकर यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेच्या विहिरीवर मोटार पंप बसवून त्याद्वारे रुग्णालयातील दोन्ही इमारतींना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही इमारतींसाठी स्वतंत्र पंपही बसविण्यात आले होते.

मात्र, पंप नादुरुस्त झाल्याने ऐनवेळी रुग्णालयाला पाण्यासाठी धावपळ करावी लागली. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक आरोग्यसेवा देणाऱ्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा यंत्रणेची नियमित देखभाल आणि पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.