वैभव नाईकांवर राकेश नेमळेकरांचा घणाघात । 10 वर्षांच्या अपयशामुळेच जनतेने घरी बसवलं ।

कुडाळ : दहा वर्षे जनतेने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, सत्ता दिली, अधिकार दिले; मात्र त्या दहा वर्षांत मतदारसंघाचा कायापालट करण्याऐवजी आता सत्ता गेल्यानंतर दुसऱ्यांनी सुरू केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची धडपड सुरू आहे. दहा वर्षे आमदार असताना विकास कुठे होता? आणि आता पराभवानंतर अचानक प्रत्येक कामाची आठवण का होऊ लागली? असा थेट सवाल करत राकेश नेमळेकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

“जनता काम करणाऱ्याच्या मागे उभी राहते, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच कुडाळ-मालवणच्या जनतेने निलेश राणेंना भरघोस मतांनी निवडून दिले. वैभव नाईक यांनी दहा वर्षांच्या आमदारकीत जनतेची कामे केली असती, विकासकामांना गती दिली असती आणि मतदारसंघाच्या प्रश्नांना न्याय दिला असता, तर जनतेने त्यांना घरी बसवलेच नसते,” असा घणाघात नेमळेकर यांनी केला.

दहा वर्षे सत्तेची संधी मिळूनही रखडलेली कामे आता विरोधकांना अचानक दिसू लागली आहेत, असा टोला लगावत नेमळेकर म्हणाले की, सत्ता असताना फाईली कुठे होत्या? निधी कुठे होता? प्रशासकीय मान्यता कुठे होती? निविदा कुठे होत्या? वर्क ऑर्डर कुठे होत्या? आणि प्रत्यक्ष कामे कुठे होती? याची उत्तरे आधी द्यावीत.

कुडाळच्या गणेश घाटाच्या कामाचा संदर्भ देत त्यांनी माजी आमदारांना थेट आव्हान दिले. “एखाद्या कामाची सुरुवात आपल्या काळात झाली म्हणून त्याचे संपूर्ण श्रेय घेता येत नाही. त्या कामाला प्रत्यक्ष गती कुणी दिली, निधी कुणी उपलब्ध करून दिला, निविदा कधी निघाली, वर्क ऑर्डर कधी झाली आणि भूमिपूजनानंतर काम प्रत्यक्षात कुणी पुढे नेले, हे कागदपत्रांसह जनतेसमोर ठेवा. श्रेयाचे राजकारण करण्यापेक्षा सत्याचा हिशोब द्या,” असे नेमळेकर यांनी सुनावले.

“दहा वर्षे आमदारकी हातात असताना कुडाळ-मालवणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची संधी होती. मात्र आता निलेश राणे आमदार झाल्यानंतर विकासकामांना गती मिळत असल्याचे दिसताच त्यावर टीका करण्याची घाई सुरू झाली आहे. दुसऱ्यांनी पुढे नेलेल्या कामांवर आपला ठप्पा मारण्याचा प्रयत्न जनतेला आता सहज समजतो,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

निलेश राणे यांच्या कामांवर सातत्याने टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा आरसा पाहावा, असा सल्लाही नेमळेकर यांनी दिला. “आज निधी आणला जातोय, रखडलेल्या कामांना गती दिली जातेय, नवीन विकासकामांसाठी पाठपुरावा केला जातोय. मग या कामांचे स्वागत करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत खो घालण्याची भूमिका का? विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी सकारात्मक राजकारण करा,” असे त्यांनी म्हटले.

वैभव नाईक यांच्या पराभवानंतरच्या राजकीय सक्रियतेवरही त्यांनी निशाणा साधला. “जनतेने नाकारल्यानंतर अचानक जनतेच्या प्रत्येक प्रश्नाची आठवण होणे हा कशाचा कळवळा? दहा वर्षे संधी मिळाली तेव्हा प्रश्न सोडवण्याची वेळ होती. आता सत्ता नाही म्हणून प्रत्येक प्रश्नाचे राजकारण करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप नेमळेकर यांनी केला.

“जनतेने तुम्हाला दहा वर्षे दिली होती; ती संधी तुमची होती. आता त्या दहा वर्षांचा हिशोबही तुमचाच आहे. त्यामुळे निलेश राणेंना प्रश्न विचारण्याआधी वैभव नाईकांनी स्वतःला तीन प्रश्न विचारावेत — काय सुरू केले? काय पूर्ण केले? आणि काय जनतेच्या उपयोगी पडले?” असा थेट सवाल नेमळेकर यांनी केला.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्यावर वारंवार होणाऱ्या टीकेलाही शिवसेना कार्यकर्ते आता उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला.

“लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; पण टीका तथ्यांवर आधारित असावी. खोटे आरोप, दिशाभूल आणि विकासकामांमध्ये राजकीय खो घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. निलेश राणेंवर पुन्हा टीका कराल, तर शिवसेना कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील,” असा स्पष्ट इशारा राकेश नेमळेकर यांनी दिला.

“आता जनता पोस्टर, फोटो किंवा मोठमोठ्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. जनता काम पाहणार आहे, निधी पाहणार आहे, तारीख पाहणार आहे आणि काम प्रत्यक्षात कुणी करून दाखवले हे पाहणार आहे. दहा वर्षे सत्ता हातात असूनही विकासाचा ठोस हिशोब देता येत नसेल, तर आज दुसऱ्यांच्या कामावर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचा आरसा पाहा,” असा अंतिम घणाघात नेमळेकर यांनी केला.