कुडाळ : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रुग्णालयाच्या आवारात नव्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाचीही पाहणी केली.
अमरावती येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही पाहणी केली. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणे, आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री सदैव सज्ज ठेवणे आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी न राहू देणे, याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
या दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील अग्निशमन सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, विद्युत पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन व्यवस्था आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची बारकाईने तपासणी करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून तत्परतेने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
या पाहणीवेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.












