रानभाज्यांचा आस्वाद अन् उद्योजकतेचा धडा! पुरळ-कलंबई शाळेत अनोखा उपक्रम

देवगड : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पुरळ-कलंबई येथे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, कौशल्यविकास, स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख आणि उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी रानभाजी मेळावा व खाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक मधुकर गुट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पुजारे, उपाध्यक्ष विधी गणेश पुजारे, समिती सदस्य, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच वाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख ज्योती ब्रम्हदंडे यांनी महोत्सवाला भेट देऊन सर्व स्टॉलची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्थानिक रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल मांडले होते. त्यांनी प्रत्येक रानभाजीची ओळख, तिचे पौष्टिक मूल्य, आरोग्यदायी उपयोग आणि औषधी गुणधर्मांची माहिती उपस्थितांना दिली. यासोबतच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी घरगुती खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून प्रत्यक्ष विक्री केली. या अनुभवातून विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, ग्राहकांशी संवाद साधण्याची कला आणि संघभावना शिकायला मिळाली.
एकाच दिवसात सुमारे १० ते १५ हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापक मधुकर गुट्टे यांनी दिली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मधुकर गुट्टे, शिक्षक रणजित पाटील, रश्मी साटम, बागुल मॅडम, सुभाष रेपाळे, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.