आगीचे तांडव; २५ मुक्या जीवांचा दुर्दैवी अंत

खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज पहाटे भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले. पहाटे सुमारे पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.