तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावीत व सातवीत शिकणाऱ्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित शोषित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सोमवारी पोलिस ठाण्यात संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापक व हाऊस मास्टर यांना बोलावून घेत पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेतली. तर याबाबत संबंधित पालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत गैरवर्तन करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे मुख्याध्यापक, हाऊस मास्टर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तालुक्यातील या विद्यालयात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचा भरणा आहे. या विद्यालयात अलीकडेच विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा प्रकार घडला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा हे विद्यालय रॅगिंग आणि लैंगिक शोषणाच्या प्रकारानंतर चर्चेत आले आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील इयत्तेत असलेल्या विद्यार्थ्यांसह रॅगिंग करणे, लैंगिक शोषणासह त्यांना मारहाण करणे व तक्रार केल्यास धमकी देण्यासारखे प्रकार या विद्यालयात घडत असल्याची चर्चा आहे. याबाबत शोषित विद्यार्थ्याच्या पालकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या कानावर घालत कारवाईची मागणी केली आहे.










