प्रत्येक घरात रोजगाराचा निर्धार ; खासदार नारायण राणे…


कणकवली : प्रतिनिधी

टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना एकदा प्रत्यक्ष पहावे यासारखा दुसरा आनंद नाही. माझ्या जिल्हावासीयांनी कलेचा आनंद लुटावा म्हणून सिंधु पर्यटन महोत्सव सुरू केला. पर्यटनातून आर्थिक समृद्धी सिंधुदुर्गात यावी, यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. सी वर्ल्ड होणार, वैभववाडी कोल्हापूर ट्रेन होणार. प्रत्येक घरात रोजगार देणार हा माझा निर्धार आहे. दोडामार्गमध्ये १२०० एकरमध्ये हजारो कारखाने उभारण्याचा संकल्प असल्याचे अभिवचन माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी कणकवली येथे दिले. कणकवली पर्यटन महोत्सवाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.गेले तीन दिवस सुरु असलेला कणकवली पर्यटन महोत्सवाचा थाटात समारोप झाला. यावेळी मत्स्यउद्योग बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात खा. नारायण राणे यांनी जनतेशी संवाद साधला.

ते म्हणाले,कणकवली मतदारसंघातून ५९ हजारांच्या मताधिक्याने मंत्री ना. नितेश राणेंना विजयी केलात. तुमचे उपकार मंत्री ना. नितेश विसरणार नाही. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मंत्री ना. नितेश राणे करणार यात शंका नाही. प्रत्येक घरात रोजगार मिळायला हवा हा माझा निर्धार आहे. दोडामार्ग मध्ये १२०० एकर मध्ये हजारो कारखाने उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे. कोकण रेल्वेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न आहेत. कोल्हापुरशी कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. असे सांगतानाच खा. राणे यांनी पर्यटन महोत्सवाच्या आयोजनाबाबत कौतुक केले. यावेळी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गायक पवनदीप राजन आणि अरुनीता कांजीलाल, चेतना भारद्वाज यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.