“मुलीला केलेला फोन ठरला अखेरचा; दापोलीत हृदयद्रावक घटना”

रत्नागिरी: कोकणात अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दापोली येथील मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील टाळसुर शाळेजवळ हा दुर्दैवी अपघात रविवारी सायंकाळी उशिराच्या सुमारास घडला. शिल्पा सुरेश साळवी असे या मृत महिलेचं नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दापोली येथील आर्यावर्त येथे शिल्पा साळवी या अनेक वर्ष स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करत होत्या. हसत खेळत राहणाऱ्या शिल्पा या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. रविवारी सायंकाळी आपल्या सहकार्यांसमवेत गप्पागोष्टी करून कामावरून घरी टाळसूर येथे जाण्यास घरी पायी निघाल्या होत्या. त्यांची विवाहित असलेली मुलगी ही सुट्टीसाठी मुंबईहून दाभोळ येथे आली आहे. शिल्पा साळवी यांनी घरी निघाल्यानंतर मुलीला कॉल केला आणि तिच्यासाठी आंबेही घेतले होते. मात्र घरी जाताना हा दुर्दैवी अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिल्पा यांनी आपल्या लाडक्या लेकीला केलेला कॉल हा अखेरचा ठरला आहे. शिल्पा साळवी यांच्या मृत्यूने टाळसुर गावात शोककळा पसरली आहे. आपल्या सहकारी असलेल्या शिल्पा साळवी यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो आणि आता त्या जगात नाहीत हे ऐकूनच त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या कर्मचाऱ्यांनीही तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
रविवारी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शिल्पा साळवी या चालत घरी निघाल्या होत्या. मात्र याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला. धडकेनंतर गंभीर जखमी अवस्थेत शिल्पा साळवी या काही वेळ रस्त्यातच पडून होत्या. हा सगळा प्रकार लक्षात येताच टाळसुरे येथील ग्रामस्थांनी धावपळ करून त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
दरम्यान, या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही दापोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शिल्पा साळवी यांच्या पश्चात सासरे, विवाहित कन्या असं कुटुंब आहे. दापोली पोलिसांनीही या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.