भरधाव कारची ओमनीला जोरदार धडक; दोघे जखमी, चालकाविरोधात गुन्हा

कुडाळ : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आकेरी दांड्याचे गाळू पुलावर रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैतान मनवेल फर्नाडिस (३८, रा. कुडव टेंब, इन्सुली, ता. सावंतवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आयुष रितेश माहेश्वरी (१८ रा. बालाजी नगर, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ मे रोजी सकाळी सुमारे ८ वा. च्या सुमारास गोवा ते मुंबई महामार्गाव आकेरी दांड्याचे गाळू येथील पुलावर घडली.
फिर्यादी कैतान फर्नाडिस हे त्यांच्या ओमनी वाहनातून प्रवास करीत असताना संशयित आयुष माहेश्वरी याच्या कारची ओमनीला पाठीमागून जोरदार धडक झाली. यात कैतान फर्नाडिस तसेच त्यांचा कामगार रामानंद कुमार पासवान (रा. बांदा) हे दोघे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याची नोंद दुपारी ३.३८ वा. करण्यात आली. साहाय्यक पोलिस निरीक्षक जे. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पाटील तसेच पोलीस हवालदार वेंगुर्लेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.