कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर आणि व्यापारी तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी थेट मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्र्यांनी कणकवली बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ही मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कणकवली बसस्थानकाला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे उत्साहात स्वागत केले. या भेटीदरम्यानच श्री. पारकर यांनी बसस्थानक परिसराच्या विकासाबाबतचे महत्त्वपूर्ण निवेदन मंत्र्यांकडे सुपूर्द केले.
नगराध्यक्षांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, या उपलब्ध अतिरिक्त जागेचा नियोजनबद्ध विकास करून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. त्याचसोबत बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण करणे, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देणे या जागेमुळे शक्य होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या जागेची सविस्तर माहिती घेतली आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.












