रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नद्या, विहिरी, तलाव आणि लहान धरणांतील पाणीसाठे झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २५ मे अखेर जाहीर केलेल्या अहवालातून ही चिंताजनक स्थिती समोर आली आहे.
५७ गावे आणि १३३ वाड्या टंचाईग्रस्त
सध्या जिल्ह्यातील ५७ गावे आणि १३३ वाड्यांमधील तब्बल ४३ हजार १४५ नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसत आहे. या भागांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.
१८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
टंचाईग्रस्त भागांसाठी सध्या एकूण १८ टँकर कार्यरत आहेत. यामध्ये ३ शासकीय तर १५ खासगी टँकरचा समावेश आहे. आतापर्यंत या टँकरच्या १ हजार ९७३ फेऱ्या पूर्ण झाल्या असून अनेक गावांचा आधार आता पूर्णपणे टँकरवरच आहे
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये टँकर सेवा सुरू झाली असली तरी लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊनही अद्याप टँकरद्वारे पुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. येथे १० गावे आणि ३१ वाड्या बाधित असून तब्बल २३ हजार ७११ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागासाठी १० टँकर सुरू करण्यात आले आहेत. संगमेश्वर तालुक्यात १६ गावे आणि ३२ वाड्या टंचाईग्रस्त असून ६ हजार ९१२ लोक प्रभावित झाले आहेत. येथे ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
खेड तालुक्यात १२ गावे आणि २३ वाड्या बाधित असून ९ हजार ४६६ नागरिकांना फटका बसला आहे. दापोली, मंडणगड, गुहागर आणि चिपळूण तालुक्यांमध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावे, वाड्या आणि बाधित नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाला आणखी टँकरची व्यवस्था करावी लागू शकते. जिल्ह्यातील पाणीस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.












