
देवगड मेडिकल फाऊंडेशनचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या Assistant Webmaster या राज्यस्तरीय पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नारायण कर्णे यांनी अधिकृतरीत्या जाहीर केली.
महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन ही राज्यातील अस्थिरोगतज्ज्ञांची प्रतिष्ठित व अग्रगण्य संघटना असून, या संघटनेच्या अधिकृत पदावर काम करण्याची संधी मिळणे ही मोठी जबाबदारी व सन्मानाची बाब मानली जाते. विशेष म्हणजे, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अधिकृत पद भूषवणारे डॉ. तन्मय आठवले हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण अस्थिरोगतज्ज्ञ ठरले आहेत. त्यामुळे ही नियुक्ती केवळ देवगडसाठीच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे.
डॉ. तन्मय आठवले हे सध्या देवगड मेडिकल फाऊंडेशन, देवगड येथे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात अत्याधुनिक अस्थिरोग सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ऑर्थोपेडिक परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. विविध ऑर्थोपेडिक कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक पॉडकास्ट, मुलाखती आणि Sports Chat Shows यशस्वीपणे होस्ट केले असून, त्यांच्या प्रभावी संवादशैलीचे वैद्यकीय क्षेत्रात विशेष कौतुक केले जाते.
डॉ. आठवले हे अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक संघटनांचे मानद सदस्य असून, वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक उपक्रम, डिजिटल कम्युनिकेशन, परिषदांचे प्रसारण, तज्ज्ञ संवाद आणि डॉक्टरांमधील व्यावसायिक नेटवर्किंग यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या डिजिटल उपक्रमांना अधिक प्रभावी, आधुनिक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय नोंदवला गेला आहे. ग्रामीण भागातून कार्यरत असलेल्या एका तरुण अस्थिरोगतज्ज्ञाने राज्यस्तरीय संघटनेत अधिकृत पद मिळवणे ही प्रेरणादायी बाब असून, वैद्यकीय क्षेत्रातील युवा डॉक्टरांसाठी ही नियुक्ती आदर्श ठरणारी आहे.
डॉ. तन्मय आठवले यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ डॉक्टर, सहकारी, विविध सामाजिक संघटना, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
“ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या डिजिटल कार्यात मी पूर्ण निष्ठेने योगदान देण्याचा प्रयत्न करेन. वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि सर्व सदस्यांचा विश्वास याच्या जोरावर MOA ला अधिक connected, visible आणि impactful बनवण्यासाठी मी कार्यरत राहीन,” अशी भावना डॉ. तन्मय आठवले यांनी व्यक्त केली.
डॉ. तन्मय आठवले यांच्या या राज्यस्तरीय नियुक्तीमुळे सिंधुदुर्गच्या वैद्यकीय क्षेत्राचा मान महाराष्ट्रभर उंचावला आहे.












