आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाणीटंचाईवर महत्त्वपूर्ण बैठक

कुडाळ तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समिती, कुडाळ येथे महत्त्वपूर्ण वार्षिक आढावा सभा पार पडली. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच टँकर व्यवस्था, विहिरींची पातळी, जलस्रोतांची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजन यावरही चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, तहसीलदार सचिन पाटील, उपसभापती सीताराम तेली, गटविकास अधिकारी मनोज भोगटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यातील प्रत्येक गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.