कणकवली : तालुक्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे खारेपाटण गावातील वीज व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून गाव काल सायंकाळी चार वाजल्यापासून रात्रभर अंधारात आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे तब्बल 7 ते 8 विद्युत पोल निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून मोबाईल नेटवर्क आणि दैनंदिन कामांवरही परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र अनेक पोल कोसळल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे












