पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या सातपाटी येथील मत्स्यबंदर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांच्यासमवेत सदर प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

सातपाटी खाडीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांना मासेमारी व नौकावाहतुकीदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून सातपाटी मत्स्यबंदर विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.




बंदरातील मूलभूत सुविधा या प्रकल्पामुळे अधिक सक्षम होणार असून स्थानिक मच्छीमारांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध होतील. तसेच मत्स्यव्यवसायाला चालना मिळून मच्छीमार बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास पालघरचे खासदार श्री. हेमंतजी सवरा, आमदार मनिषाताई चौधरी, आमदार राजन नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांसह स्थानिक मच्छीमार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












