दोडामार्ग तालुक्यातील सोनावल, तेरवण-मेढे तसेच पाळये परिसरात आज सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याने धुमाकूळ घालत तब्बल दीड तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या असून काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक काजू कलमे मुळासकट उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट ठरला आहे. काजू व आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
सोनावल गावचे सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांची बाग या वादळात मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली. त्यांच्या बागेतील तब्बल ३० काजू कलमे जमिनदोस्त झाली असून मेहनतीने जोपासलेली बाग काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्यासह तेरवण-मेढे, सोनावल, पाळ्ये परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी आंब्यांची गळती झाली असून काजू बागांनाही जबर फटका बसल्याचे चित्र आहे. निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित कोलमडले असून लाखो रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अवकाळी पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील बागायतदार भयभीत झाले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे. संदेश वरक यांनीही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.










