सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणासह विशेषतः सिंधुदुर्गावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडताना त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा अशी आपली मागणी असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
केसरकर म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाच्या सध्याच्या आराखड्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मी पत्र दिले आहे. सद्याचा ठरवलेला मार्ग हा कोकणावर अन्याय करणारा असून नागपूरहून येणारा पर्यटक थेट गोव्याला जाणार असेल तर हा कोकणवर अन्याय आहे. कोकणात उत्कृष्ट असे समुद्र किनारे आहेत, बंदर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील माल गोव्याच्या बंदावरून आयात- निर्यात का व्हावा ? हा प्रश्न आहे. हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराला जोडला गेला पाहिजे. हा रस्ता हायवेला क्रॉस करत असल्याने लोक पत्रादेवीला जाऊ शकतात. तसेच कोकणचा कोस्टल रोड विरार पासून इथे जोडला जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होणारा शक्तीपिठ मार्ग केवळ चंदगडवरून गोव्याला जोडला जाऊ नये. चंदगडला दुर्लक्षित करावं असं आपलं म्हणणं नसून एक फाटा तिलारी मार्गे उत्तर गोव्याला अन् एक फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक चंदगड अन् दोडामार्ग तालुक्यात वाढतील.
याबाबत पालकमंत्री नितेश राणेंसह चंदगडच्या आमदारांशीही माझी चर्चा झाली आहे. फोरलेन हायवे चंदगडवरून दोडामार्ग अन् गोव्याला जोडला गेल्यास मधला इको सेन्सिटिव्ह झोन देखील वाचेल. तर, आंबोली, फणसवडे, केसरीच्या खालून बोगदा काढून मार्ग गेल्याने इको सेन्सिटिव्ह भागालाही धोका निर्माण होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केले.











