T20 विश्वचषकात भारताचा दमदार विजय ; पाकिस्तानचा 61 धावांनी उडवला धुव्वा

कोलंबो : विश्वचषकाच्या साखळी फेरीतील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलंबो येथे झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 175 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला आणि पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 114 धावांत गारद झाला.

भारतीय डावाची सुरुवात थोडी खराब झाली होती, तरी ईशान किशनने जबाबदारी स्वीकारत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 77 धावांची दमदार खेळी साकारत संघाला भक्कम स्थितीत नेलं आणि सामनावीराचा मान पटकावला. त्याला तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी चांगली साथ दिल्याने भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पाकिस्तानकडून साईम अयूबने तीन विकेट घेतल्या.

176 धावांच्या पाठलागाला उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराने पहिल्याच काही षटकांत पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद करत दबाव निर्माण केला. उस्मान खानने 44 धावांची झुंजार खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने पाकिस्तानचा डाव 114 धावांवर आटोपला.

भारतीय गोलंदाजीत बुमरा, पांड्या, अक्षर पटेल आणि वरुण यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर कुलदीप यादव आणि तिलक वर्माला प्रत्येकी एक यश मिळालं. या विजयासह भारताने T20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील स्थान निश्चित करत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.