देवगड : देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका होमस्टेमध्ये गोव्यातील मायलेकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ते शनिवारी १४ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी होमस्टेच्या मालकांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा येथील पर्यटक शुक्रवारी रात्री सुमारे ८.३० वाजता देवगड तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी देवदर्शन करून पुढील प्रवासासाठी रवाना होण्याचा त्यांचा मानस होता. मात्र शनिवारी सकाळी चेक-आउट वेळ उलटूनही संबंधित पर्यटक बाहेर न आल्याने संशय निर्माण झाला.
होमस्टेच्या मालकांच्या पत्नीने खिडकीचा पडदा बाजूला करून आत डोकावून पाहिले असता आई व मुलगा यांनी नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मृतांमध्ये शारदा कृष्णा गावडे (वय ६४, रा. गोवा) व त्यांचा मुलगा सुदेश कृष्णा गावडे (वय ३५, रा. गोवा) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक नयोमी सातम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव व पोलीस हवालदार महेंद्र महाडिक अधिक तपास करत आहेत.












