कोकण रेल्वेच्या सोयी सुविधा, राज्य अंतर्गत प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडविले जातील. तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातील आंबा पिकासाठी रो-रो सेवा व अन्य सुविधा प्रश्नाला न्याय देण्यासाठी लक्ष केंद्रीत करू. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहाही स्टेशनच्या विकासासाठी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत अहवाल तयार करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खा. नारायण राणे यांनी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सदस्यांना दिली.
सिंधुदुर्गातील मडुरा ते खारेपाटण मार्गावरील प्रत्येक स्टेशनच्या समस्या, नांदगाव रेल्वे स्टेशनवर कृषी बाजार समितीच्या माध्यमातून होऊ घातलेले मार्केट यार्ड, आंबा वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगी, वैभववाडी स्टेशनवर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा, आचिर्णे स्टेशनवर प्लॅटफॉर्म उभारणी, सिंधुदुर्ग स्टेशनवर पी. आर. एस. सिस्टीम सुरू करणे, कोरोनापासून बंद असलेली दिवा- रत्नागिरी- मडगाव व रत्नागिरी- दादर गाड्या पुन्हा सुरू करणे, कसाल येथे रेल्वे स्थानकाची निर्मिती आदींबाबत पदाधिकाऱ्यांनी खा. राणे यांच्याशी चर्चा केली.
जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या दहाही स्टेशनचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत प्रवासी समितीचा पाहणी दौरा होणे आवश्यक आहे. त्या अहवालानुसार रेल्वे मंत्र्यांकडे विविध प्रश्नांची मागणी करणे सोयीचे ठरेल. कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्गसह अनेक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे डिजिटल बोर्ड असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रक आणि कोणत्या दिवशी कोणती गाडी किती वाजता थांबेल याचे सुस्पष्ट फलक लावणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रवाशांना आठवड्यातून स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती पुरेपूर होऊ शकेल. कोकण रेल्वे तोट्यात आहे, परंतु प्रवाशांच्या सुविधांकडे आणि समस्यांकडे लक्ष देत नाही. प्रकाश पावसकर यांनी या सर्व प्रश्नांबाबत आपण लक्ष देऊन वस्तुस्थितीदर्शक अहवालाची माहिती घेऊन रेल्वे मंत्र्यांकडे आपल्या समवेत एक बैठक आयोजित करण्याबाबतचाविचार करावा,अशी सूचनाही मांडली. खा. नारायण राणे म्हणाले, या सर्वच प्रश्नावर राज्यस्तरावरच्या न्याय प्रश्नांची उकल होण्यासाठी राज्य शासनाकडे कोकण रेल्वेच्या स्टेशन अंतर्गत सुविधासाठी झालेल्या कराराबाबतची माहिती घेऊन शेड व अन्य सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू व त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आणि गोवा, केरळप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ही रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करावा या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील.
कोकणवासीयांच्या सोयी सुविधांसाठी आर्थिक अडचणीत असलेली कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करून सर्व सुविधा पुरविण्यासाठी सर्व प्रवाशांचा हातभार लागावा. जेणेकरून रेल्वेचे प्रश्न, समस्या सुटू शकतील. तसेच गोवा केरळ व अन्य राज्यांना कोकण रेल्वेचा तीन टक्के सीएसआर फंड सिंधुदुर्ग, रत्नागिरी महाराष्ट्र राज्यांतील जिल्ह्यांमध्ये खर्च झाला नसेल तर तो सीएसआर फंड प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करू. तसेच कसाल या नियोजित रेल्वे स्टेशनसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून कसाल नवीन रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खा. नारायण राणे यांनी दिली.










