दापोली वणंद गाव एसटी बस सेवा बंद; प्रवाशांची पायपीट ..

दापोली तालुक्यातील वणंद गावातून आसुदकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे गावातून जाणारी एसटी बस सेवाही बंद झाली आहे. तर एसटी बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांना पायपीट करत मुख्य मार्गावर जावे लागत आहे.


राज्य परिवहन महामंडळाच्या हर्णे मार्गावरील एसटी बस फेऱ्यांपैकी काही फेऱ्या या वणंद मार्गे जात होत्या. मात्र वणं गावातील व गावातून आसुदकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट असल्याने या गावातून एसटी बस फेरी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या मार्गावर दुचाकी चालवणे देखील जिकरीचे झाले आहे. वणंदपासून आसूदपर्यंत या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही अंशी रस्ता चांगला तर काही रस्ता खराब आहे.


शिवाय केशवराज जवळ पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा मार्ग अरूंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे एसटी बस चालकांना गाडी चालविताना अडचण निर्माण होत आहे. कोटींच्या कोटी विकासकामात उड्डाणे घेणाऱ्या दापोली तालुक्यातील हे विरोधाभासी चित्र असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रतिनिधी याचबरोबर प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करून वाहतुकीसाठी हा रस्ता सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.