
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अखेर आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सोमवारी किंवा मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तब्बल चार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रांची (EVM) ने-आण सुरू करण्यात आली आहे. यामुळे निवडणुका अगदी तोंडावर आल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांकडून आजच्या दिवसात मंजूर झालेल्या विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन आटपून घेण्याचे आदेश देण्यात आल्याने स्थानिक नेत्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. आज रविवार असल्याने जिल्हाभरात ‘नारळ फोडण्यात’ स्थानिक नेते बिझी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कधी जाहीर होणार, याची इच्छुक उमेदवारांना मोठी प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा आता अवघ्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजपासूनच अधिकृत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचा न्यायालयाचा आदेश असल्याने प्रशासनावरही वेळेचा दबाव आहे. त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी आचारसंहिता लागू होऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता अधिक बळावली आहे.कोकणशाही सिंधुदुर्ग