सिंधुदुर्गात घुमणार ‘जय नारायण’चा गजर

राणे समर्थकांचा शक्तिप्रदर्शनाचा एल्गार

बांदा ते कणकवली भव्य रॅलीने राजकीय तापमान वाढले

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राणे कुटुंबात विसंवाद असल्याच्या चर्चा राज्यभर पसरवल्या जात होत्या. मात्र या सर्व चर्चांना जोरदार छेद देत “जय नारायण…”चा गजर पुन्हा एकदा जिल्हाभर दुमदुमू लागला आहे. खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राणे समर्थक कार्यकर्ते एकवटले असून, बांदा ते कणकवली दरम्यान काढण्यात येणारी भव्य रॅली ही केवळ रॅली नसून एक स्पष्ट राजकीय एल्गार ठरत आहे.

कणकवली आणि कुडाळमध्ये झालेल्या समर्थकांच्या बैठका पाहता, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आता आत्मविश्वासात रूपांतरित झाल्याचे स्पष्ट दिसते. “आमची ओळख—राणे कुटुंबीय” आणि “जय नारायण” अशा घोषणांनी सोशल मीडियावर वातावरण तापले असून, ही चळवळ केवळ मैदानापुरती मर्यादित न राहता डिजिटल पातळीवरही वेगाने पसरताना दिसते.

या रॅलीचे महत्त्व केवळ संख्याबळात नाही, तर त्यामागील संदेशात आहे. खा. नारायण राणे, आ. निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे एकत्रित आगमन म्हणजे विसंवादाच्या चर्चांवर पूर्णविराम देणारे शक्तिशाली प्रतीक आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पक्षीय भूमिका वेगळ्या असू शकतात; मात्र नेतृत्व, परंपरा आणि समर्थकांची नाळ अजूनही घट्ट आहे, हेच या रॅलीतून अधोरेखित होणार आहे.

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही शक्तिप्रदर्शनाची तयारी विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील प्रस्तावित मेळावा हा केवळ भाषणांचा कार्यक्रम न राहता, आगामी राजकीय दिशा ठरवणारा टप्पा ठरण्याची दाट शक्यता आहे.

एकूणच, “जय नारायण…” या घोषणेभोवती उभा राहिलेला हा एल्गार सिंधुदुर्गाच्या राजकारणात नवा आत्मविश्वास, नवी उर्जा आणि नवा अध्याय लिहिण्याची नांदी ठरत आहे. आता उद्याच्या या भव्य रॅलीनंतर जिल्ह्याचे राजकीय चित्र कितपत बदलते, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.