हुंबरट तिठ्यावर अपघात ; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणाऱ्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिक (२२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमन खतिक हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा घरी परतत असताना हुंबरट तिठा परिसरात महामार्गावरून सर्व्हिस रोडकडे वळणाऱ्या चिरेवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी ट्रकला मागाहून जोरदार आदळली.

या धडकेत अमनच्या डोक्यासह शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की, अमनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत अमनचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे आणला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अमनच्या अपघाताची माहिती मिळताच काही वेळातच त्याचे कुटुंबीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, अमनचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांच्या दुःखाचा बांध फुटला. अमनच्या गावातील नागरिकांसह त्याचे मित्रमंडळीही रुग्णालयात दाखल झाले होते.अमन खतिक याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार असून, या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकणशाही कणकवली