
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचाराने चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार असल्याचे समोर आले होते. मात्र दररोज पाऊस पडत असल्यामुळे आझाद मैदानात चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह ज्या-ज्या भागात पूरस्थिती आहे, त्या भागातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी मुंबईमध्ये न बोलवता त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की, शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्यांच्या बांधावर जा, शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करा. पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांचा देखील दसरा हा सण आहे, त्यामुळे त्यांना जे-जे काही आवश्यक आहे, त्यांना मदतीचा हात देण्याचा काम करा. त्या भागातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना आवाहन करतो की, पूरस्थितीमध्ये जे संकटात सापडले आहेत, त्यांचे अश्रू पुसण्याचं काम करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथली जी यंत्रणा ती काम करेल आणि संकटात सापडलेल्यांचा दसरा व दिवाळी चांगला करण्याचा प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले.
दसरा मेळावा आमची जी परंपरा आहे, ती खंडीत होता कामा नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा सुरू राहावी, यासाठी यंदाचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे हा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यातून शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत. हे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार आहेत, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. ब्यरो न्यूज कोकणशाही मुंबई









