‘
अजय कांडर लिखित नाटकातील चर्चेत मान्यवर रंगकर्मींचा सहभाग
कणकवली/प्रतिनिधी
मानवी कल्याणाचा विचार ज्या कलाकृतीतून व्यक्त होतो ती कलाकृती श्रेष्ठ असते. समता, करूणा आणि वैचारिक मंथन हे कलाकृतीचे बलस्थान असते. कवी अजय कांडर यांच्या युगानुयुगे तूच या कवितेवर मीही लेखन केले होते.आता त्याच कवितेवरील अभिनेता सचिन वळंजू अभिनित, रघुनाथ कदम दिग्दर्शित नाटक पाहताना त्यातील करुणा प्रभावीपणे व्यक्त झाली असून हे या नाटकाचे खरे यश आहे असे प्रतिपादन विख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले.
मुंबई कांचन आर्ट निर्मित सचिन वळंजू अभिनित, रघुनाथ कदम दिग्दर्शित युगानुयुगे तूच नाटकाचा मुंबईतील पहिला प्रयोग प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात अनेक मान्यवर रसिकांच्या मोठ्या प्रतिसादात सादर झाला. नाटकानंतर झालेल्या चर्चेत श्री गज्वी यांनी युगानुयुगे तूच नाटक दीर्घकाळ रंगमंचावर सादर होत राहील असा विश्वासही व्यक्त केला.यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, ज्येष्ठ समीक्षक मीना गोखले, ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अनिल बांदिवडेकर, मुंबई विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालक प्रा.डॉ .अनिल सकपाळ, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ, चित्रपट समीक्षक उदय कुलकर्णी, अभिनेत्री तथा कवयित्री कविता मोरवणकर, रंगकर्मी विठ्ठल सावंत, लेखक प्रा.आत्माराम गोडबोले, नाट्यलेखक राजेश कोळंबकर, अभिनेता वैभव सातपुते, अभिनेता प्रितेश मांजलकर आदीसह नाटक, चित्रपट,मालिका क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अभिनेते अनिल गवस म्हणाले, सचिन वळंजु यांनी युगानुयुगे तूच हा दीर्घांक अतिशय प्रभावीपणे सादर केला. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आम्ही प्रभावित झालो. संवादाच टाइमिंग एवढं उत्तम होते की प्रत्येक संवादाला दाद मिळत गेली. चांगलं नाटक हे लेखकावर असतं तसं ते दिग्दर्शक आणि अभिनेत्यावरही असतं या दृष्टीने हे कलाकृती महत्त्वाची आहे. कवी अजय कांडर हे आमचे मित्र आहेत ते कोकणात साहित्य चळवळ गंभीरपणे राबवितात आणि मुंबईत येऊन आपले नाटक सादर करतात ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी जसजसे आम्ही समजून घेत गेलो तसतसे अधिक धीरगंभीरपणे समाजही समजत गेला. आज बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व दूर भारतात पोहोचविण्याची सर्वाधिक गरज असताना बाबासाहेब सर्वांचे कसे आहेत, समतेचा विचार कसे सांगतात आणि स्त्रियांबद्दल आदर कसा बाळगताय हे सगळं या नाटकात मांडण्यात आले आहे.या नाटकाचे प्रयोग सतत होत राहावेत. आम्ही या नाटकाचा अभिनेता सचिन, लेखक अजय कांडर आणि दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्यासोबत कायम असू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखनाचे अभ्यासक डॉ.प्रा. अनिल सकपाळ म्हणाले, “युगानुयुगे तूच” हे अजय कांडर यांचे त्यांच्या दीर्घ काव्याचे त्यांनीच लिहिले उत्तम दृकश्राव्य माध्यमांतर आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातील घटनाप्रधान प्रसंगांपेक्षा बाबासाहेबांच्या विचार आणि तत्त्वज्ञानाची मांडणी हे नाटक करते. “युगानुयुगे तूच” ही व्यक्तिगत भावनांना अवकाश निर्माण करून देणारी कविता नाटकात समूह संवेदनांना आवाहन देते. शोषित, सर्वहारांचे प्रतिनिधित्व करणारे आंबेडकर इथे प्राधान्याने दिसतात. स्त्रीया, आर्थिक सर्वहारा, जातीय विषमतेचे बळी यांच्याविषयी हे एकपात्री नाटक संविधान साक्षीने बाबासाहेबांशी प्रतिकात्मक संवाद करते. बाबासाहेबांच्या विचार आणि कार्याचे महत्त्व विशद करत असताना हे नाटक आत्मपरीक्षण करण्यासाठी उद्युक्त करते. सचिन वळंजू यांचा नैसर्गिक अभिनय आणि रघुनाथ कदम यांनी दीर्घ काव्याचे नाट्य सादरीकरण करताना स्वीकारलेली प्रयोगशीलता हे या नाटकाचे वैशिष्ट्ये आहे.
नाटक पहाताना डोळ्यातून अश्रू आले
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ म्हणाल्या,नाटक पाहताना डोळ्यातून अश्रू आले. डॉ.बाबासाहेबांचे विचार समजून घ्यायला सर्व समाज कमी पडला असून डॉ.बाबासाहेबांनी एकूणच स्त्रियांबद्दल केलेले काम कधीच विसरता येणार नाही. हे सगळंच कवी अजय कांडर यांनी युगानुयुगे तूच या कवितेत मांडले असून रघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेते सचिन वळजु यांनी त्यातील करुणे समर्थपणे रसिकांपर्यंत पोहचवली आहे.