रत्नागिरी
उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून यावेळी ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहरात येतक्या एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रमजान ईद व गुढीपाडवा या सणांमुळे एप्रिलपासून पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शीळ धरणात गतवर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा आहे. मात्र वाढता उष्मा व १५ जूनपर्यंत नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणार आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवनाने पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. तो धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठीच दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.










