तिहेरी अपघात ; ५ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी….

ब्युरो न्यूज कोकणशाही

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार, आज, बुधवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. जयपुर लांडे फाट्या समोर हा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच २४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.अधिक माहिती अशी की, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी पुण्याकडून परतवाडाकडे एक एसटी महामंडळाची बस जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे.