ब्युरो न्यूज कोकणशाही
विरोधकांच्या डोक्यात फक्त ‘कबर आणि कामरा’ आहे, पण आमच्यासाठी महाराष्ट्रातील १३ कोटी जनता महत्त्वाची आहे,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेतला आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. माथाडी सुधारणा विधेयक आणले, शेतकरी आणि कामगारां संदर्भात महत्त्वाच्या चर्चा केल्या. जिथे सहा तास काम अपेक्षित असते, तिथे आम्ही रोज नऊ तास सभागृह चालवले. मोठे बहुमत असूनही आम्ही कोणतीही चर्चा टाळली नाही. आमचे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे नव्हे, तर काम करणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.










