ब्युरो न्यूज कोकणशाही
छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं.त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून पांगव. मात्र कालांतराने ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा त्याच परिसरात जमा झाला. यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची कुमक कमी असल्याने पोलिसांना या जमावाला पांगवण्यात काहीसे अपयश आले. परिणामी पोलिसांनी पोलिसीबळाचा वापर केला असता जमावाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली.
दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारस चिटणीस पार्क चौकाकडून एक मोठा गट महालच्या परिसरात आला. तोपर्यंत गणेशपेठ पोलीस, कोतवाली पोलीस, इतवारी पोलीस स्टेशन शिवाय अधिकची पोलीस कुमक महाल आणि लगतच्या परिसरात तैनात करत या जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला. मात्र मुख्य रस्त्यावरील हा जमाव कालांतराने गल्लीबोळात शिरला आणि तिथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. यात अनेक दुचकी आणि कार जाळल्याची घटना घडली.










