कुडाळ
बेळगांव येथील सेट्रींग कामगार शंकर सिध्दाप्पा कावलदार (५०) हे पावशी लिंग मंदिराच्या बाहेर मयत स्थितीत आढळून आले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास निदर्शनास आली.याबाबत फिर्याद पावशी पोलिसपाटील शेखर शिवाजी शेलटे यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. पावशी गावामध्ये राहणारे शंकर सिध्दाप्पा कावलदार हे मागील ३० वर्षापासून वास्तव्यास आहेत. सेंट्रींग काम करून ते आपला उदर निर्वाह करीत.पोलिसपाटील श्री. शेलटे व गावकऱ्यांना शंकर कावलदार हे १३ व १४ मार्च रोजी लिंगमंदिराजवळ दिसले होते. १५ मार्च रोजी पोलिसपाटील श्री. शेलटे हे सकाळी गावात फेरफटका मारत असताना लिंगमंदिरा बाहेर शंकर कावलदार हे निपचित पडलेले दिसले. श्री. शेलटे आणि इतर गावकऱ्यांनी त्यांना रूग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मयत झाल्याचे झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद कुडाळ पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.










