भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलजार’ या युद्धनौकेचे शनिवारी दुपारी विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन झाले. विजयदुर्ग परिसराच्या पर्यटनात वाढ व्हावी या हेतूने ही युद्धनौका कायमस्वरूपी विजयदुर्ग बंदरात ठेवावी, अशी मागणी होती. शासनाने तशी ई-निविदाही प्रसिद्ध केली होती; मात्र आता शासनाने या जहाजाच्या संवर्धनाबाबत अन्य पर्याय जाहीर केल्याने विजयदुर्ग वासीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.भारतीय नौदलाचे निवृत्त आयएनएस गुलदार हे जहाज भारतीय नौदलाची केवळ युद्धनौका नसून सागर संरक्षण, सामाजिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीने बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन ही युद्धनौका विजयदुर्ग येथे आणावी व पर्यटकांसाठी ती कायमस्वरूपी येथे ठेवावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली होती. त्यामुळे ही नौका यापुढे कायमस्वरूपी विजयदुर्ग विसावेल, असा विश्वास होता. भारतीय नौदलाचे निवृत्त आयएनएस गुलदार हे जहाज कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावर नांगरलेले होते. शनिवारी या बोटीचे आगमन विजयदुर्ग बंदरात झाले. हे जहाज ८१ मीटर लांब आणि १२०० टन विस्थापन असलेले आहे. ३० मिमि. क्लोज रेंज गन आणि रॉकेट लॉचर्सने सुसज्ज असलेली ही युद्धनौका ३० डिसेंबर १९८५ साली नौदलात समावेश करण्यात आली होती.युद्ध सज्जते व्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्ती वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठी वापरली जायची. विजयदुर्ग खाडी सुमारे ४२ किलोमीटर लांबीची असून ४० ते ५० मीटर खोल आहे. नागमोडी वळण, खाडीच्या दुतर्फा डोंगर असलेली ही सुरक्षित वादळी परिस्थितीतही नौकांना उपयुक्त आहे.मराठा आरमाराचा मान राखा विजयदुर्ग बंदरामध्ये आलेली आयएनएस गुलजार ही युद्धनौका निवती बंदर येथे नेण्यात येणार असल्याचे वृत्त समजल्यामुळे विजयदुर्गवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे… यासंदर्भात किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी ही युद्ध नौका मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या विजयदुर्गमध्येच उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही युद्धनौका विजयदुर्गमध्येच पाण्याच्या पृष्ठभागावर नांगरून येथील पर्यटनाला चालना देऊन मराठा आरमाराचा मान राखावा, असे आवाहन परुळेकर यांनी केली आहे विजयदुर्ग येथील पर्यटनात अधिक वाढ व्हावी या हेतूने विजयदुर्ग येथे अशा प्रकारच्या पर्यटनात्मक प्रकल्प आल्यास पर्यटन वाढून रोजगार निर्मिती होईल असा हेतू होता. मंत्री नितेश राणे यांनी संबधित बंदर खात्याचा कारभार स्वीकारल्यामुळे विजयदुर्गवासीयांची ही मागणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र शासनाकडून या जहाजा बाबत अन्य पर्याय जाहीर झाल्याने विजयदुर्ग वासीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.शिवकालीन आरमार केंद्र असलेल्या विजयदुर्ग बंदरात हे जहाज कायमस्वरूपी उभे राहावे व पर्यटनाला बळकटी मिळेल, असा विश्वास होता. मात्र हे जहाज अन्य ठिकाणी नेणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र हे जहाज ठेवण्यासाठी आरमाराची राजधानी असलेल्या विजयदुर्गला प्राधान्य द्यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.










