सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत तारकर्ली येथे राजेश्वर मंदिर नजिक डॉ. केरकर व्हिला येथे सुमारे ३५ महिलांना राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून ७५ टक्के अनुदान पद्धतीने ई बाईक प्रदान करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाजचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गाड्यांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
मासे विक्री करणाऱ्या, मासे मासे सुकवणाऱ्या, मुळे काढणाऱ्या व खेकडे पकडणाऱ्या महिला या मच्छिमार महिला आहेत आणि अशा मच्छिमार महिलांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्था ही महाराष्ट्रात एकमेव अशी संस्था आहे, या संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी संस्थेसाठी व मच्छिमार महिलांसाठी मोठी मेहनत घेतली आहे. याच प्रयत्न व मेहनतीमधून या संस्थेच्या मार्फत राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून ७५ टक्के अनुदान पद्धतीने महिलांना ई बाईक प्रदान करण्यात येत असून मच्छिमार महिलांच्या व्यवसायाच्या दृष्टीने ई बाईक महत्वाच्या ठरतील असे माजी आमदार परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.










