मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू…

बांदा

इन्सुली गावातील नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी स. ७ वा. च्या सुमारास उघडकीस आली. हेपोलिन परेरा (४५, रा. इन्सुली) असे या मृताचे नाव आहे.
हेपोलिन व त्याचा सहकारी सायमन फर्नांडिस हे एकत्र मोल मजुरीचे काम करत असत. मंगळवारी सकाळी सायमन हा हेपोलिन याच्या घरी त्याला सोबतीला कामावर नेण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या घराला कुलूप असलेले पाहून त्याने शेजारील घरात चौकशी केली. यावेळी शेजाऱ्यांनी हेपोलिन हा सोमवारी रात्री मासे पकडण्यासाठी नदीवर गेल्याचे सांगितले. त्यामुळे सायमन हा हेपोलिनला शोधत नदीवर गेला. यावेळी नदीतील वाघाची ढोल येथे नदीमध्ये हेपोलिनचा मृतदेह सायमन याला दिसून आला. त्याने ग्रामस्थांना घटनास्थळी बोलवून ही माहिती दिली. पोलिस पाटील यांनी याबाबत बांदा पोलिसांना माहित दिल्यानंतर बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढला. यावेळी हा मृतदेह हेपोलिनचा असल्याचे सायमन यांनी सांगितले. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात दिला.