औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच ‘कार्यक्रम’ ; ना. नितेश राणे…

संगमेश्वर;

औरंगजेबापासून हिंदू समाजाचे संरक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजीराजेंनी केले आहे. हिंदू धर्मासाठी स्वतःची आहुती देऊन मोठे बलिदान देणारे छत्रपती संभाजीराजे यांचे लवकरच भव्य दिव्य स्मारक कसबा येथे उभारले जाणार आहे. हे स्मारक पाहाण्यासाठी अख्खं जगच येथे येईल, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन कार्यक्रमात व्यक्त केला.याचवेळी संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच ‘कार्यक्रम’ करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. संगमेश्वर शास्त्री पूल या ठिकाणी हा कार्यक्रम हिंदू धर्म रक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री नितेश राणे यांनी महायुतीचे सरकार हे हिंदुत्वाचे सरकार आहे. हिंदू समाजाने महायुतीचे पाच वर्षांसाठी सरकार बसवले आहे. यामुळे या हिंदूंसाठी व हिंदू रक्षणासाठी महायुतीचे सरकार कार्य तत्पर राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांनी कसबा येथील संभाजी स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद देखील केली आहे. यामुळे लवकरच भव्य दिव्य असे संभाजी महाराजांचे स्मारक उभे केले जाणार आहे. यासाठी देसाई वाड्याचे मालक व स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मोठी जमीन ताब्यात घेऊन हे स्मारक उभारले जाणार आहे.आज अनेक स्वतःला अभ्यासक समजणारे चुकीचा इतिहास लोकांसमोर आणत आहेत. अशा गैरसमज पसरणाऱ्यांचे चेहरे हिंदू रक्षकांनी ठेचणे गरजेचे आहेत. आमचे सरकार बोलून दाखवत नाही तर करून दाखवत आहे. आज अनेक गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम करण्यात आले.महाराजांचा छळ करुन मारणाऱ्या औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रासाठी काळा डाग असून, संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर व सजवण्यात आलेली जागा लवकरच उध्वस्त केली जाणार असल्याचे ना. राणे यांनी जाहीर करून हा कार्यक्रम लवकरच केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.कोणीही कितीही हिंदू धर्माबाबत बोलत असतील अशांना हिंदू धर्मातील प्रत्येक सण दणक्यात साजरे करूनउत्तर देण्याची वेळ आली आहे असेही ना. राणे यांनी याप्रसंगी नमूद केले.छत्रपती संभाजी राजे यांचा बलिदान दिवस साजरा करण्याचे महनीय काम गेली तीन वर्षे माजी आमदार प्रमोद जठार करत आहेत त्यांचेही अभिनंदन श्री राणे यांनी करून शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत मनोगताची सांगता केली.या प्रसंगी आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा विशद करत अशा महान राजाच्या बलिदानाने हिंदुत्व टिकून राहिले आहे. यामुळे न भूतो न भविष्यती असे स्मारक उभे राहणार असल्याचे नमूद केले. यासाठी सरकारकडून स्मारकाकडे जाणारे मार्ग व व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने केले जाईल असे सांगितले. त्याचप्रमाणे संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर तोडून टाका अशी मागणीही त्यांनी कार्यक्रमात केली.या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी शासनाचे अभिनंदन केले. स्मारक आपल्या विभागात होत असल्याचा आनंद देखील व्यक्त केला. कसबा ते शृंगारपूर या मार्गावर अनेक वीरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्यासाठी जीवाची आहुती दिली आहे, अशा सरदारांची गावे देखील या परिसरात असल्याचे मत व्यक्त केले.माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील स्मारक उभारले जात असल्याबाबत शासनाचे कौतुक केले. संयोजक माजी आमदार प्रमोद जठार, राहुल पंडित, राजेश सावंत, वर्षा ढेकणे, राजेंद्र महाडिक, रोहन बने ‘ पूजा निकम आदी उपस्थित होते.