चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज प्रयत्नशील…

सिंधुदुर्ग :

 जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर हा विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल मेंबर राजन नाईक व संतोष राणे यांनी फ्लाय९१  या विमान कंपनीच्या गोवा येथील मुख्य कार्यालयात कंपनीचे मालक व वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून फ्लाय९१ ची उड्डाणे नियमित होण्यासाठी आग्रही निवेदन दिले. प्रामुख्याने सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी फ्लाय९१ ने प्रयत्न करावेत अशी मागणी मासीया तर्फे करण्यात आली. त्यावेळी ही सेवा सुरू होण्यासाठी मुंबई विमानतळावर फ्लाय९१ कंपनीला स्लॉट मिळणे अत्यावश्यक असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सदरील स्लॉट मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे फ्लाय९१ विमान कंपनीला सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई येथे सुरू होत असलेल्या नवीन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून येणाऱ्या जाणाऱ्या विमान कंपन्यांसाठी स्लॉट मिळवण्यासाठी मासियातर्फे केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर यांच्या बरोबर चर्चा करून विशेष प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले.