सावंतवाडी,
दुचाकीचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर गाडी आदळून झालेल्या अपघातात सावंतवाडीत होमगार्ड प्रसाद राऊत हा गंभीर जखमी झाला. ते परिक्षा केद्रांवर ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय समोर घडली. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे हलविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. राऊत हे आज दहावीची परिक्षा असल्यामुळे त्यांना सावंतवाडीत ड्युटी लावण्यात आली होती. परंतू कोलगाव आयटीआय पसिरातून येताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला गाडी आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली अशा अवस्थेत त्यांना तेथे जमलेल्या काही ग्रामस्थ व प्रवाशांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. याबाबत अपघाताची नोंद सावंतवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतची खबर रवींद्र जाधव यांनी दिली.










