सावंतवाडी,
बाहेरचावाडा परिसरात राहणाऱ्या चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरातील तब्बल ४ लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे. हा प्रकार आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. सोनू कुरेशी (रा. गुजरात) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रफीक नाईक यांच्या घरात कुरेशी हा आपल्या मामा समवेत भाड्याने राहत होता. आज तो नेहमी प्रमाणे चादरी विकण्यासाठी आपल्या मामा समवेत गोवा येथे गेला होता. दरम्यान दुपारी त्याला बाजूला राहणाऱ्या अन्य एका सहकाऱ्याने फोन केला तसेच त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडलेला आहे, अशी त्यांने माहिती दिली. त्यानुसार त्याने सायंकाळी खोलीकडे येवून पाहणी केली असता त्याठिकाणी खोलीचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी त्यांनी आत जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली रोख रक्कम चोरीला गेल्याचे पुढे आले.
याबाबत त्यानी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष नईम मेमन व हंजला नाईक यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जावून खबर दिली. यावेळी पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक माधुरी मुळीक, प्रविण वालावलकर, मनोज राऊत, रामदास जाधव, लक्ष्मण काळे आदींनी त्या ठिकाणी जावून पंचनामा केला. त्यानंतर सीसीटिव्हीची तपासणी केली असता त्यात तिघे चोरटे कैद झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










