दोडामार्ग,
काजू बागेत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला शेतमांगर अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे कळणे सडा येथे उघडकीस आली. मांगरात ठेवलेल्या काजू बीसह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात लक्ष्मण तुकाराम देसाई या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञाताविरुद्ध त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तेथे त्यांनी काजू बागायत केली आहे. बागायतीत साफसफाई करण्यासाठी व काजूच्या झाडांवर औषध फवारणीसाठी लागणारे पंप, मशीन ठेवण्यासाठी त्यांनी शेतमांगर बांधला आहे. शनिवारी पहाटे लक्ष्मण देसाई काजू बागायतीत गेले असता शेतमांगर आगीत जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. मांगरात ठेवलेल्या काजू बी व शेतीपयोगी साहित्य पाहण्यास गेले असता तेही आगीत खाक झाल्याचे दिसले. ते दृश्य पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती समजताच कळणे-भिकेकोनाळ सरपंच अजित देसाई तसेच शेतकरी संघटना अध्यक्ष देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. या भागात काही दलाल मंडळी जमिनी हेरून ती परप्रांतियांना विकत आहेत. जमिनींचा सर्वे करायला सोपे जावे, यासाठी या भागात आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत आणि यातच आपला मांगर अज्ञाताने पेटवून दिल्याचा संशय लक्ष्मण देसाई यांनी व्यक्त केला. त्यामुळे मांगर जाळून नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.










