अनधिकृतपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेवर आज पहाटे कारवाई…

मालवण,

आचरा समुद्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या विघ्नहर्ता-५ या नौकेवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यात नौकेसह तब्बल सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई देवगडचे मत्स्यविकास अधिकारी पार्थ तावडे व त्यांच्या पथकांकडून करण्यात आले. संबंधित नौका ही मालवण येथील अनिल कामत यांच्या मालकीची असून ती राजकोट येथील सतीश आचरेकर यांनी मासेमारीसाठी घेतली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.ही नौका आचरा येथे समुद्रकिनाऱ्याजवळील जलदी क्षेत्रात अनधिकृतरित्या एलईडीच्या साह्याने मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर समुद्रात नियमित गस्त घालणाऱ्या पथकाने त्यांच्यावर ही कारवाई केली. या कारवाईत नौकेवर पाच खलाशी आढळून आले आहेत, अशी माहिती मत्स विभागाकडून देण्यात आली आहे.