वैभववाडी :
तब्बल १४ महिन्यांनंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एस.टी. महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एस. टी. वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही.
करूळ घाटाच्या नूतनीकरणासाठी गेल्यावर्षी २२ जानेवारीपासून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सुरुवातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर घाटातील कामाचा आढावा घेत प्रशासनाकडून वाहतूक सुरू करण्याच्या तारीख पे तारीख देण्यात आल्या. मात्र, प्रशासन त्या-त्या तारीखला घाट मार्ग सुरू करू शकले नाही. त्यामुळे सर्वांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत उबाठा सेनेकडून घाट सुरू करण्यासाठी घाटाची पाहणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. करूळ घाटाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी घाटाची पाहणी केली होती. तसेच सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊनच त्यानंतर वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली. तर स्वतः जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी करूळ घाटात भेट देऊन पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. सध्या काही दिवस वैभववाडी करूळ घाटातून कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर कोल्हापूरकडून येणारी वाहतूक ही पूर्वीप्रमाणे भुईबावडा घाटातून सुरू राहणार आहे. १५ मार्चनंतर आढावा घेऊन दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. गेले १४ महिने घाटातून वाहतूक बंद असल्याचा फटका प्रवाशी वाहतूकदार, व्यापारी तसेच शेतकरी यांना बसला आहे. एकेरी वाहतूक सुरू झाल्यामुळे या सर्वांना थोडासा दिलासा मिळाला आहे.










