मिठबांव रामेश्वर देवस्थान उत्सवा वरील स्थगितीची मागणी फेटाळली मिठबांव गावचे प्रमुख ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या श्री रवळनाथ, पावणाई, गजबादेवी इत्यादी १२ देवस्थानांसंदर्भात ग्रामदेवता रामेश्वर परिसरात होणाऱ्या उत्सवांवर प्रतिबंध लावण्यासाठी जेठे, नरे मानकरी कुटुंबियांनी जोगल, लोके, राणे, घाडी, फाटक, गुरव इत्यादी ११ मानकऱ्यांविरुध्द केलेला ताकीद अर्ज देवगड दिवाणी न्यायाधीश सौ. एन. बी. घाटगे यांनी नामंजूर करुन फेटाळला आहे. याकामी जोगल, लोके, राणे, घाडी, फाटक, गुरव या ११ मानकऱ्यांचेवतीने अॅड. कौस्तुभ मराठे यांनी यशस्वी युक्तीवाद केला.मिठबांव गावचे ग्रामदैवत असणाऱ्या रामेश्वर मंदीरात सुमारे ३०० वर्षांनंतर वार्षिक उत्सव सुरु होत असल्यानिमित्त दि. २५ व २६ डिसेंबर २०२४ रोजी तरंग प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम देवस्थान समितीने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आव्हान देणारा दिवाणी दावा देवगड न्यायालयात जेठे व नरे मानकरी कुटुंबियांनी दाखल केला होता. वादी जेठे, नरे यांनी वार्षिक उत्सवांच्या रुढीपरंपरा जोगल, लोके, राणे, घाडी, फाटक, गुरव इत्यादी ११ मानकऱ्यांनी डावलल्याचा आरोप करत देवगड दिवाणी न्यायालयात प्रतिबंधात्मक ताकीद आदेश मागणारा दिवाणी दावा दाखल केला होता. सदर दाव्यात वादी जेठे, नरे कुटुंबियांनी दावा प्रलंबित असताना कोणत्याही प्रकारचे उत्सव देवस्थानात साजरे करु नये म्हणून अंतरीम ताकीद आदेश मे. न्यायालयाकडे अर्ज करुन मागितला होता. तथापि याकामी झालेल्या सुनावणीत देवगड न्यायालयाने जेठे, नरे कुटुंबियांचा ताकीद अर्ज नामंजूर करुन फेटाळला आहे. दरम्यान या आदेशानंतर काल दि. २४ फेब्रुवारी रोजी मिठबांव रामेश्वर देवस्थानात नवीन तरंग देखील प्रस्थापित करण्यात आले आहेत. तसेच मिठबांव रामेश्वर देवस्थानमधील सर्व वार्षिक उत्सव सुरु करण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला आहे.










