लिंगेश्वर मंदिरात आज हरिनाम सप्ताह…

कुंभवडेतील गावठणवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. होणार आहे. मंगल घटस्थापनेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे सात प्रहरांचा हा हरिनाम सप्ताह संपन्न होणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कुंभवडे आणि परिसरातील भजन मंडळांबरोबर जिल्ह्यातील अनेक भागांतून भजन मंडळे उपस्थित राहून भजनरुपी सेवा श्री देव लिंगेश्वर चरणी सादर करणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी होईल. बुधवार २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री यात्रा पवित्र तीर्थावर जाऊन मंगल तिर्थस्नान आणि दुपारी महाप्रसाद आहे. रात्री ९ वा. सुस्वर संगीत भजन रात्री पौराणिक दशावतारी नाटक आणि शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी पळसकोंड येथे देवांसहित जाऊन वार्षिक श्री पावणादेवी भेट असा भरगच्च धार्मिक उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान संचालक आणि कुंभवडे ग्रामस्थांनी केले आहे.