सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आज जिल्हा दौरा…

गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम मागील वर्षापासून वेगाने सुरू झाले आहे. या महामार्गाच्या पाहणी आणि अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गुरुवार, दि. २० रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी दुपारी ३.३० वाजल्यापासून ते महाड येथून महामार्गाच्या पाहणीला सुरुवात करणार आहेत. महाड ते कशेडी पाहणी भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यामुळे कामाला वेग
माजी मंत्री व भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असताना मागील दोन वर्षे सातत्याने महामार्गाचे काम वेगाने होण्यासाठी प्रयत्न केले. कशेडी बोगदा असो की रस्त्यांच्या कामांना त्यांनी वेग दिला. त्यामुळे भाजपचे मंत्री असणारे शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर महामार्ग पूर्ण करण्याची विशेष जबाबदारी टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
दुपारी ४ ते ४.३० वाजता कशेडी बोगद्याची पाहणी करणार आहेत. बोगद्यातील काही कामे शिल्लक असून, हा बोगदा लवकरच सुरू करण्याबाबतचा निर्णय बांधकाम मंत्री जाहीर करण्याची शक्यता आहे. सायंकाळी
५ वाजता कशेडी ते परशुराम, राष्ट्रीय महामार्ग सा. बां. विभाग पॅकेज ४ ची पाहणी करणार आहेत. परशुराम घाटातील कोसळणाऱ्या भागाची पाहणी करुन अभियंत्यांशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी ५ ते ५.४५ वाजता परशुराम- चिपळूण- आरवली, सायंकाळी ५.४५ ते ६.३० वाजता आरवली ते कांटे, सायंकाळी ६.३० ते ७ वाजता कांटे ते हातखंबा येथील कामकाजाची पाहणी करणार आहेत. सायंकाळी रत्नागिरीतील विश्रामगृह येथे वास्तव्य करणार आहेत.
शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ९.१५ वा. रत्नागिरी ते हातखंबा या मिया- -नागपूर महामार्ग आणि त्यानंतर सकाळी ९.१५ ते १०.१५ वाजता हातखंबा ते वाकेड, राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर अणुस्कुरा घाटमार्गे ते कोल्हापूरला रवाना होणार आहेत.
मुंबई – गोवाच्या पाहणी दौऱ्यात प्रत्येक टप्प्याचा आढावा घेतला जाणार आहे. विशेषत: नद्यांवरील पुलांची कामे आता वेगाने सुरु असून, त्यांचीही पाहणी केली जाणार आहे. डिसेंबर २५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष घातले आहे. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांचीही चांगलीच धावपळ सुरू आहे.