रत्नागिरी
महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शंभूराजेंच्या बलिदानाची महती विद्यार्थ्यांना कळावी यासाठी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीमध्ये दाखवण्यात यावा, अशी मागणी राजापूर-लांजाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
पत्राद्वारे केली आहे.गुरुवारी छत्रपतीशिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपतींना अभिवादन करून, आ. किरण सामंत यांनी ही मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य आणि बलिदान यासह महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा चित्रपटाद्वारे जगासमोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून, महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेता यावा, महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिक जागृती व्हावी यासाठी छावा हा हिंदी चित्रपट शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीमध्ये दाखवण्यात यावा, अशी मागणी आ. किरण सामंत यांनी केली आहे









