दोडामार्ग
तिलारी प्रकल्पाच्या पाईप्ससह शेतमांगर बेचिराख सासोली माळरानावर अग्नितांडव दोडामार्ग अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेत मांगरासह तिलारी जलसंपदा विभागाचे अंडरग्राउंड पाण्यासाठी वापरणारे पाईप आगीत भस्मसात झाल्याची घटना सासोली येथे रविवारी दुपारी घडली. यात शेतकरी व जलसंपदा विभागाच्या ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दोडामार्ग नगरपंचायतच्या अग्निशमन बंबच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.सासोली- भरपाल कुडासे मार्गालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली. रणरणत्या उन्हात आगीने रौद्ररूप धारण केले. क्षणार्धात आग सर्वत्र पसरली. परिणामी आकाशात सासोली आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेला शेतमांगर, तर काही पाईप आगीत सापडल्याने बाहेर पडणारे आगीचे मोठे लोळ.आगीचे मोठे धूर दिसू लागले. हे धूर येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडू लागले. दरम्यान आगीच्या विळख्यात शेतकरी अर्जुन डुस्कर यांची आंबा बाग सापडली. यात त्यांची बाग व शेतमांगर जळून खाक झाला. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, काहींनी याबाबत दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. बंब दाखल झाला तोपर्यंत आग आसपासच्या परिसरात पसरली. जलसंपदा विभागाच्या ठेकेदाराने काम करण्यासाठी येथे पाईप आणून ठेवले होते. या पाईपना आग लागताच आगीचे मोठे लोळ उठू लागले. बंब दाखल होताच स्थानिकांनी आग विझविण्याचा अतोनात प्रयत्न केला व काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या दरम्यान काही पाईप आगीत जळाले होते.










