उद्धव गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कोकणात उद्धव गटाला खिंडार पडले आहे. मंत्री उदय सामंत , आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल आणि उद्धव गट कमकुवत होईल, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.ठाण्यात आनंद आश्रमाच्या बाहेर राजन साळवी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. लांजा आणि राजापूर येथून आलेल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे दोन्ही बंधू उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.










