कुडाळ ; प्रतिनिधी
नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका आफ्रिन करोल व अक्षता खटावकर यांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी काम केल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली. दरम्यान वरील दोन्ही नगरसेविका भाजच्या वाटेवर असल्याची चर्चा असून, यासाठीच काँग्रेसने या दोघींची हकालपट्टी केल्याचे समजते.अडीच वर्षापूर्वी झालेल्या कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीला १७ पैकी ९ जागांवर विजय मिळाला होता, यामध्ये शिवसेना (आताचा ठाकरे गट) ७ तर काँग्रेस २ असे मिळून महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. तर विरोधी भाजपचे ८ नगरसेवक विजयी झाले होते. साहजिकच कुडाळआफ्रिन करोल, अक्षता खटावकर नगरपंचायतीवरमहाविकासआघाडीचा झेंडा फडकला होता. महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार पहिल्या टप्प्यात काँग्रेस व दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेला नगराध्यक्ष पद देण्याचे निश्चित झाले होते; त्यानुसार पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या आफ्रिन करोल, त्यानंतर कॉंग्रेसच्या अक्षता खटावकर यांना प्रत्येकी सव्वा सव्वा वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केले. अलीकडेच सौ. खटावकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्यानुसार नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. सौ. खटावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील सरकार एक नगरसेविका महायुतीकडे गेल्यामुळे महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष बसू शकला नाही, परिणामी शिवसेनेची नगराध्यक्षपदाची संधी हुकली, त्यातच राज्यस्तरावर बदललेली राजकीय गणिते, ठाकरेंची दुभंगलेली सेना, लोकसभा व विधानसभेत झालेला पराभव यामुळे स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचले गेले. दुसरीकडे भाजपने आपली संघटना वाढवण्यासाठी कुडाळमध्ये विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्या प्रयत्नांना अपेक्षित यश येत असल्याचे बोलले जात आहे. कुडाळ नगरपंचायतमधील काँग्रेसच्या वरील दोन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे समजते.










