ठाकरे गटाला मोठा धक्का ; गटाचे बडे नेते देणार पक्षाचा राजीनामा…

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु होती ती अखेर खरी ठरली आहे. कोकणातील ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी कुठल्या पक्षात प्रवेश करणार? ते अखेर निश्चित झालं आहे. ठाण्यात उद्या दुपारी 3 वाजता ते शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता. किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु आहेत. मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. ते पक्ष सोडणार असून ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.आता राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच समजतय. उद्या दुपारी 3 वाजता राजन साळवी ठाण्यातील आनंदाश्रमात शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश करतील.