कणकवली प्रतिनिधी दि ०६
राज्य सरकारने महावितरण ऐवजी अदानी आणि आणखी काही समूहासोबत करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसविण्याचा घाट घातला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लुटमार होणार आहे. पुढील काळात वीज ग्राहकांना मोबाईल प्रमाणे वीजेचा रिचार्ज मारावा लागणार आहे.महाराष्ट्र आणि देशांमध्ये ज्या सार्वजनिक पायाभूत सुविधा होत्या त्या वापरून स्वतःच्या खिसा भरणे हा हेतू ठेवून अदानी सध्या काम करत आहेत. गेल्या दहा वर्षात अदानी उद्योग समूहाने सर्व क्षेत्र काबीज करण्यास सुरू केली आहे. महावितरण ही सार्वजनिक कंपनी सध्या खाजगीकरणाच्या वाटेवर आहे. ज्या विद्युत ग्राहकांच्या मीटर मध्ये काहीतरी बिघाड आहे त्या ग्राहकांना स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यासाठी अदानी उद्योग समूहाचे कर्मचारी प्रत्येकाच्या घरी ये आहेत. तत्कालीन उर्जामंत्री व सध्याचे मुख्यमंत्री यांनी सामान्य ग्राहकाला स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवले जाणार नाही असा शब्द दिला होता. मात्र सद्यस्थिती पाहता सामान्य गरीब वीज ग्राहकांना लुटून अदानींचे खिसे भरणे हे धोरण सरकारचे दिसत आहे. त्यामुळे सरकारचे हे धोरण हाणून पाडले नाही तर सामान्य वीज ग्राहकाला वीज वापरणे अशक्य होणार आहे. यासाठीच हा जनमोर्चा काढण्यात येणार आहे असे संपत देसाई यांनी सांगितले.










